नांदुरा ः 45 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 160 कर्मचारी करवून घेणार मतदान!; पोलिसांचा मोठा फौजफाटा!!
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार संपला असून, उद्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार होती.
मात्र शेंबा खुर्द, पिंपळखुटा खुर्द, वसाळी खुर्द या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 45 ग्रामपंचायतींसाठी 147 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एका मतदान केंद्रावर चार कर्मचारी असे 160 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणासुद्धा सज्ज झाली आहे. यासाठी 8 अधिकारी, 111 पोलीस कर्मचारी आणि 88 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. मतदान कर्मचारी व पोलीस कर्मचारी सर्व साहित्यासह आजच आपल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नेमलेल्या वैशाली देवकर (उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद), नांदुरा तहसीलदार राहुल तायडे, नांदुरा ठाणेदार सुरेश नाईकनवरे याबाबत योग्य ती काळजी घेत आहेत.