धक्कादायक… पावसाअभावी करपलेल्या पिकावर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर!; संग्रामपूर तालुक्यातील प्रकार
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निसर्गाच्या लहरीपणाचे दर्शन यंदा जिल्हावासीयांना होत आहे. चिखली तालुक्यात धो धो पावसाने जमीन खरडली तर शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात पावसाअभावी पिके करपली. एकीकडे पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट तर दुसरीकडे अधिकचा पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट असे चित्र जिल्हाभर आहे. या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा मात्र हैराण झाला आहे. सुरुवातीला थोडाफार चांगला पाऊस पडला. सोयाबीन पेरले, पेरलेले उगवलेही नंतर मात्र पावसाने दांडीच मारली. शेवटी वाट पाहून थकलेल्या शेतकऱ्याने पावसाअभावी करपलेल्या १० एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी प्रशांत खोंडे यांनी स्वतःच त्यांच्या करपलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील शेतकरी संजय निमकर्डे यांनीही त्यांच्या पेरलेल्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला.
बावनबीर येथील शेतकरी प्रशांत खोंडे यांनी सोनाळा- बावनवीर रोडवर बावनबीर शिवारात १० एकर शेती ठोक्याने केली आहे. त्यांनी त्या शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी १७ जून रोजी केली होती. पेरणीनंतर पावसाने दडी मारली आणि उन्हाचा चटकाही वाढला. त्यामुळे उगवलेले पीक तग धरू शकले नाही. पूर्ण पिक करपून गेले. आता पाऊस पडला तरी करपलेली पिके पुन्हा सुधारणार नाहीत म्हणून नाईलाजास्तव खोंडे यांना त्यांच्या पिकात ट्रॅक्टर घालावा लागला. खोंडे यांना ठोक्याचे पैसे व मशागत पेरणी खर्च प्रति १ एकर १० हजार रुपये असा एकूण १ लाख रुपये खर्च आला होता. त्यांचे १ लाखांचे नुकसान आताच झाले आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील शेतकरी संजय निमकर्डे यांनी त्यांच्याकडील ४ एकर शेतात २२ जून रोजी सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने उगवलेले सोयाबीन पूर्णपणे करपून गेले. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करून पीक मोडून टाकण्याची वेळ निमकर्डे यांच्यावर आल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुबार पेरणीचे पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.