दोन संजयांच्या तलवारी अखेर म्यान… आमदार कुटेही म्हणाले, विषयावर पूर्णपणे पडदा!; कार्यकर्त्यांनाही केली विनंती!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन संजयांच्या भांडणाचा दी एन्ड अखेर आज, 20 एप्रिलला होऊन बुलडाणा शहर आणि एकूणच जिल्हा अभूतपूर्व तणावातून मुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे विशेष पोलीस महानिरिक्षक चंदकिशोर मीना यांची भेट घेऊन बाहेर पडलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी भांडणानं जिल्ह्याचं भलं होणार नाही. दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार होऊन हे थांबवलं पाहिजेत, अशी प्रतिक्रिया दिली असताना दुसरकीडे आमदार संजय कुटे यांनीही या विषयावर पूर्णपणे पडदा टाकण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. यापुढे केवळ कोरोनाशी लढायचे आहे, असेही सांगायला या दोन्ही नेत्यांनी कमी केले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आता वाद-विवाद, सोशल मीडियावर चुकीच्या कमेंट टाळणे गरजेचे आहे.
आमदार संजय कुटे यांनी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास केलेल्या फेसबुक लाइव्हमध्ये म्हटले आहे, की विचारांशी विचारांनी लढले पाहिजेत. टीकेला टीका करावी पण भाषा घसरायला नको. मी संबंधितांना उद्देशून (गायकवाडांना) मवाली हा शब्द वापरला होता. पण तो मला बोलावासा वाटला. कारण त्यांनी माझ्यावर अत्यंत चुकीच्या शब्दांत टीका केली होती. मात्र मवाली हा शब्द शिवी नाही. मलाही लोक मवाली म्हणतात. पण तरीही कुणाच्या आणि जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. माझ्यासाठी हा विषय आता पूर्णपणे संपलेला आहे. कार्यकर्त्यांनीही हा विषय इथेच संपवावा. सकाळी मला अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले. त्यांनी संताप व्यक्त केला. काही जण बुलडाण्याच्या दिशेने निघाले होते. त्या सर्वांना माझी विनंती आहे. बुलडाण्याला जाऊ नका. कुणी माझ्यावर कशीही टीका केली तरी जनतेला मी कसा आहे हे माहीत आहे. मी जनतेच्या आशीर्वादाने सतत निवडून त्यामुळेच येतो. सध्या जिल्हा कोरोनाच्या संकटात आहे. त्यामुळे प्रशासनावर दबाव नको. आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. माझी हात जोडून कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी हा विषय थांबवावा. मला गॅरंटी आहे की माझा कोणताही कार्यकर्ता आता हा विषय वाढवणार नाही. नेत्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांचा वापर करू नये. कारण आपल्या भांडणात त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असते. आपण सेवेसाठी जन्म घेतलेले लोकं आहोत. समाजाला जे अपेक्षित आहे तसं वागलं पाहिजेत. दगडफेक करून कुणी मोठा होत नसतो. आपली ती संस्कृतीही नाही, असे कुटे म्हणाले.