दोन दिवसांपासून होते बेपत्ता… विहिरीत आढळले तरुण-तरुणीचा मृतदेह; घातपात, अपघात की आत्‍महत्‍या? खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ११ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला. ही घटना काल, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पिंपळगाव राजा (ता. खामगाव) येथे समोर आली. भालेगाव बाजार येथील प्रमोद ऊर्फ सुरेश रामदास भांबळकर (३२) व दुर्गा रामदास सावरकर (१८) दोघेही ११ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दोघेही …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ११ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला. ही घटना काल, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पिंपळगाव राजा (ता. खामगाव) येथे समोर आली.

भालेगाव बाजार येथील प्रमोद ऊर्फ सुरेश रामदास भांबळकर (३२) व दुर्गा रामदास सावरकर (१८) दोघेही ११ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दोघेही हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्‍यांचा शोध सुरू होता. काल सायंकाळी सहाच्‍या सुमारास पिंपळगाव राजा येथील विठ्ठल मधुकर पाटील हे शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत तरुण- तरुणीचे मृतदेह दिसले. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतिश आडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

सायंकाळी सातच्‍या सुमारास मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. बेपत्ता असलेल्या सुरेश आणि दुर्गाचेच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. विहिरीच्या बाजूला एक विनाक्रमांकाची दुचाकी अपघातग्रस्त अवस्थेत आढळल्याने प्रकरणाचे गौडबंगाल वाढले आहे. हा अपघात आहे की घातपात की आत्महत्या हे अजूनही स्पष्ट झाले नाही. तपास ठाणेदार सतिश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन हिवाळे करत आहेत.