दुपारी एकला येणारे नाना पोहोचले रात्री ११ ला; रिकाम्या खुर्च्यांना दिली काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आयोजित केलेला काँग्रेस कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा सुपर फ्लॉप ठरला. नाना येतील, येतील… म्हणता म्हणता रात्री ११ च्या सुमारास नाना खामगावात आले. तोपर्यंत विजयाचा संकल्प घेण्यासाठी आलेले कार्यकर्ते थकून थकून घरी निघून गेले होते. त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांना अन् मूठभर कार्यकर्त्यांना काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्याची नामुष्की प्रदेशाध्यक्ष नानावर ओढवली.
काल, १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संकल्प मेळावा होणार होता. या कार्यक्रमाची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र दुपारी १ ऐवजी हा कार्यक्रम माजी आमदार सानंदा आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी रात्री ८ वाजता सुरू केला. दोघांनी भाषणे केली. सानंदा यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना शपथ दिली. मशाली पेटवल्या. पुन्हा नाना येतील असा निरोप आल्याने कार्यकर्त्यांना थांबण्याचे आवाहन करण्यात आले. १० मिनिटं, १५ मिनिटं असं म्हणता म्हणता नानांचा ताफा ११ च्या सुमारास कार्यक्रमस्थळी पोहोचला. तोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. नाना आल्याने दुसऱ्यांदा मशाली पेटवण्यात आल्या. जमलेल्या व दमलेल्या मोजक्या कार्यकर्त्यांना, रिकाम्या खुर्च्यांना पुन्हा प्रतीज्ञा देण्यात आली. जास्तीचा वेळ झाल्याने नानांनी भाषणही आटोपते घेतले. क्रांतिकारक गोऱ्यांशी लढले आता आपली लढाई चोरांशी आहे, असे म्हणत त्यांनी टाळ्या मिळवल्या. मोदी सरकारवर टीका केली आणि कार्यक्रमाचा शेवट झाला.