तालिबानची राजवट आली म्हणून भारतातील काहींना आनंद; हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांचा हल्लाबोल
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली म्हणून भारतातील काहींना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. इस्लामिक राजवट आली म्हणून भारतातल्या लोकांना आनंद वाटायचे कारण काय? असा सवाल हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केला.
खामगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असताना त्यांनी आज, २७ ऑगस्ट रोजी पत्रकारांशी संवाद साधला. भारताबाहेर ज्यांचे तीर्थक्षेत्र नाही. ज्या लोकांना भारत मातृभूमी, पितृभूमी एवढेच नव्हे तर पुण्यभूमी आहे असे वाटते अशा हिंदू समाजाने जागरूक होण्याची आवश्यकता आहे. भारतात राहून तालिबानी राजवटीचा आनंद साजरा करणाऱ्यांना भारतातसुद्धा तशी राजवट यावी असे वाटत असते, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्रातील आघाडी सरकारची युती ही अनैतिक संबंधातून तयार झाली आहे. तत्त्वज्ञान पायदळी तुडवून स्वार्थासाठी हे लोक एकत्र आले आहेत. ज्यांचे विचारच जुळत नाहीत ते लोक सत्तेसाठी एकत्र आले आहेत. विश्वासाने त्यांना निवडून दिले. मात्र त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला, असेही ते म्हणाले.