तपोवनमध्ये पाणी”बळी’!: विद्युत मोटारचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू, मोताळा तालुक्यातील घटना
मोताळा (संजय गरुडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नळ आल्याने विद्युत मोटार लावून पाणी भरत असताना शॉक लागून विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना आज, 15 जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास तपोवन (ता. मोताळा) येथे घडली. सौ. मंजू अर्जुन गरुडे (30) विवाहितेचे नाव आहे.
सकाळी साडेदहाला नळ आले. नेहमीप्रमाणे 15 ते 20 मिनिटांत नळ जात असल्याने घाईघाईने सौ. मंजू या पाणी भरत होत्या. त्याचवेळी विद्युत मोटारचा जबर शॉक लागला. ही घटना त्यांच्या सासूंनी पाहिली. त्यांनी आरडाओरड केल्याने लोक धावले. त्यांनी तातडीने सौ. मंजू यांना ऑटोने धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपोवन येथे 12 गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र आठ दिवसांआड नळाला पाणी येते, तेही अपुरे. गैरव्यवहारात अडकलेली ही 12 गाव पाणीपुरवठा योजना नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. या योजनेव्यतिरिक्त ग्रामपंचायत प्रशासनाची कोणतीही पाणीपुरवठ्याची योजना नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. राजकारणी फक्त मते मागण्यासाठी येतात मात्र जनतेच्या मुलभूत गरजा भागविण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायत प्रशासन जनसामान्यांच्या जीवाशी खेळतेय, असाही संताप त्यांनी व्यक्त केला. सौ. मंजू यांना दोन मुले, दोन मुली असनू, त्यांचे मातृछत्र हरवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
महावितरणचाही गलथान कारभार
प्राथमिक आरोग्य केंद्रातून सौ. मंजू यांचा मृतदेह घरी आणल्यावर अचानक विद्युत तार कोसळली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र महावितरणच्या निष्काळजीपणा जनतेच्या जीवावर उठलाय का, असा प्रश्न ग्रामस्थांनी व्यक्त केला.