जळगाव जामोदच्या एसटी वाहकामुळे बनावट पासचा गोरखधंदा समोर!; चतुराईने भामट्याला दिले पोलिसांच्या ताब्यात!!
जळगाव जामोद (सय्यद अली मुर्तजा ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी महामंडळाच्या जळगाव जामोद आगाराच्या जळगाव जामोद – पुणे बसमध्ये वाहकाच्या चाणाक्षपणामुळे बनावट पास जप्त करण्यात आला. वाहक योगेश दत्तात्रय किवंडे यांनी ही बाब समोर आणली.
किवंडे हे 6 फेब्रुवारी 2021 रोजी बस पुणे ते जळगाव जामोद फेरीवर कर्तव्य बजावित होते. औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकावरून पुणे बस दुपारी 3 वाजता जळगाव जामोदकडे निघाली. प्रवाशांना तिकिटे देत असताना एजाज पठाण यांनी रा. प. कर्मचाऱ्याची मोफत प्रवास सवलत पास दाखविली. ही पास बनावट असल्याची शंका वाहकाला आली असता. त्यांनी हर्सूल पोलीस स्टेशनमध्ये बस थांबवून पास व पासधारक प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिले. औरंगाबाद आगार क्रमांक 2 येथेस पासची तपासणी केली असता ती पास बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलीस स्टेशनला वाहकाने तक्रार दिली. वाहक योगेश किवंडे यांच्या चतुराईने एसटी महामंडळाच्या अशा बनावट पास बनविल्या जात असल्याचा खुलासा झाला. आर्थिक नुकसान होण्यापासून वाचविले. या कामगिरीबद्दल विभाग नियंत्रक संदीप रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी अमृतराव कच्छवे यांनी वाहकाचा सत्कार केला.