जलंब प्राथमिक आरोग्‍य केंद्राचा भोंगळ कारभार चव्‍हाट्यावर!; रुग्‍णाच्‍या नातेवाइकाने केले गंभीर आरोप!!

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जलंब प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा एका रुग्णाच्या नातेवाइकाने समोर आणला आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने इर्मजन्सीमध्ये ते रुग्णांना कधीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना तातडीने शेगावला हलविण्यशिवाय पर्याय राहत नाही. कुत्र्याने चावा घेतल्याने 14 वर्षीय मुलाला जलंबला आणले …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जलंब प्राथमिक आरोग्‍य केंद्राचा भोंगळ कारभार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा एका रुग्‍णाच्‍या नातेवाइकाने समोर आणला आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने इर्मजन्सीमध्ये ते रुग्‍णांना कधीच उपलब्‍ध होत नाहीत. त्‍यामुळे रुग्‍णांना तातडीने शेगावला हलविण्यशिवाय पर्याय राहत नाही. कुत्र्याने चावा घेतल्याने 14 वर्षीय मुलाला जलंबला आणले होते. मात्र बराच संपर्क करूनही डॉक्‍टर आले नाहीत, अशी तक्रार रुग्णाच्‍या नातेवाइकाने करत या प्रकरणी जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

विजय सुभाष टेकाडे (रा. कुरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की आत्‍येभाऊ गजानन ज्ञानेश्वर धंदर (14, रा. कुरखेड) याला गावातील मोकाट कु्त्र्याने चावा घेतला होता. त्‍यामुळे त्‍याला तातडीने जलंब प्राथमिक आरोग्‍य केंद्रात आणले. या ठिकाणी शिपाई श्री. गाढे यांच्‍याव्यतिरिक्‍त कुणीच नव्‍हते. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोळंके मॅडम यांना संपर्क केला असता त्‍यांनी फोन उचलला नाही. तालुका आरोग्‍य अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्‍यांनी डॉ. सोळंके मॅडम यांना पाठवतो असे सांगितले. पण दीड-दोन तास प्रतीक्षा करूनही डॉ. सोळंके मॅडम किंवा इतर कुणीही आले नाही. अखेर रुग्‍णाला शेगावला सईबाई मोटे सामान्‍य रुग्‍णालयात हलवले.

अनेक तक्रारी…

जलंब प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील कर्मचाऱ्यांविरोधात रुणांच्‍या नातेवाइकांच्‍या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नातेवाइकांकडून होत आहे. त्‍यामुळे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जणू मनमानी करण्याचे मनोबल वाढले आहे. जलंबच्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्रावर आजूबाजूच्‍या बहुतांश खेड्यांचा भार आहे. तरीही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानीपणा कायम आहे. एखाद्या गंभीर रुग्‍णाच्‍या प्राणावर हे बेतले तर जबाबदार कोण असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

रुग्‍णाच्‍या नातेवाइकाचा उपोषणाचा इशारा

वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी हजर न राहिल्या प्रकरणी 15 दिवसांत चौकशी करून कार्यवाही झाली नाही तर जलंब प्राथमिक आरोग्‍य केंद्रासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा विजय टेकाडे यांनी दिला आहे.