जय जिजाऊ, जय शिवराय…च्या घोषाने दुमदुमले शेगाव!
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शेगाव शहर व तालुक्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व कोरोनाविषयक नियम पाळून विविध कार्यक्रम घेत उत्साहात साजरी करण्यात आली. जय जिजाऊ, जय शिवराय..च्या घोषाने अवघे शेगाव आज दुमदुमले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याला कालच नगरपरिषदेच्या वतीने आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती. आज सकाळपासूनच विविध संघटना व पक्षांच्या वतीने महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार घालून दुग्धाभिषेक करण्यात आला. काँग्रेसतर्फे पक्ष नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, भारतीय महाक्रांती सेनेचे विदर्भ अध्यक्ष ज्ञानेश्वर ताकोते व पदाधिकारी, कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्षा सौ. शकुंतलाताई बुच व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भूषण दाभाडे व पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचप्रमाणे विविध संघटनांनी शिवरायांना अभिवादन केले.
शहरातील महाराणा प्रताप चौक येथे जाणता राजा सेवा ग्रुपतर्फे छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून शिवजयंती साजरी करण्यात आली. पाळोदी गावामध्ये शशिकांत अनंतराव भेंडे यांच्या निवासस्थानी सर्व नियमांचे पालन करून तरुण वर्गाच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
दसरानगर चौकातील श्री छत्रपती सेवा ग्रुपतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. गणेशनगर येथील चौकात सुद्धा शिवभक्तांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. माळीपुरा चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ स्थानिक शिवभक्तांनी छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवजयंती साजरी केली.
मराठा पाटील युवक समितीतर्फे शिव व्याख्यात्या जयाताई मांजरे यांचे जाहीर व्याख्यान शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला माऊली स्कूल ऑफ स्कॉलरच्या प्रांगणात आयोजित केले होते. मंचावर मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे, जळगाव जामोद विधानसभा पक्षनेत्या सौ. स्वातीताई वाकेकर, बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ पाटील, शेगावचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र दादा पाटील, माजी नगरसेवक पांडुरंग बुच, प्राध्यापक भूषण दाभाडे, मराठा पाटील युवक समितीचे शहराध्यक्ष श्याम आढाव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी विठ्ठल अवताडे, अविनाश शेजोळे, विठ्ठल लांजुळकर, ज्ञानेश्वर ढोले, दत्ता खोंड, ईश्वर लांजुळकर, नितीन कराळे, दत्ता वडतकर, भारत चोपडे, गणेश गोडे, अमोल हिंगणे, आकाश पाटील, ललित खोंड, ऋषभ शेजोले, अविनाश शेजोले, गौरव लांजुळकर, युवराज शेजोळे, धनंजय शेजोले, अजय खोंड, गौरव खोंड व मराठा पाटील युवक समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.