जनता कर्फ्यू : संतनगरीतील रस्‍ते सुनसान…;व्‍यापारी हवालदिल!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळपासून कडक जनता कर्फ्यू लागू केला आहे. आज 28 फेब्रुवारीच्या सकाळी यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. रस्त्यांवर पोलिस व कारवाई करणाऱ्या पथकांव्यतिरिक्त दुसरे कुणीही नव्हते. आठवडी बाजाराला तिन्ही बाजूंनी बॅरिकेट लावून रस्ता बंद केला आहे. शेगाव येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासन अधिक अलर्ट आहे. शनिवारी …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्‍हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळपासून कडक जनता कर्फ्यू लागू केला आहे. आज 28 फेब्रुवारीच्‍या सकाळी यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. रस्‍त्‍यांवर पोलिस व कारवाई करणाऱ्या पथकांव्‍यतिरिक्‍त दुसरे कुणीही नव्‍हते. आठवडी बाजाराला तिन्ही बाजूंनी बॅरिकेट लावून रस्ता बंद केला आहे.

शेगाव येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्‍यामुळे प्रशासन अधिक अलर्ट आहे. शनिवारी आणि आजही नागरिक कर्फ्यूला चांगला प्रतिसाद देत आहेत. कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने प्रशासनासह नागरिकांचीही डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना आखल्या. पण त्‍याची अंमलबजावणी झाली नाही. त्‍यामुळे कदाचित शेगाव शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्याचे मत व्‍यक्‍त होत आहे.

व्‍यापाऱ्यांचे हाल

गेल्या वर्षभरात सतत लॉकडाऊन आणि कोरोनाच्‍या गडद छायेखाली वावरणाऱ्या व्यापारी, उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे. श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुन्‍हा बंद झाले आहे. शेगावातील बरेचसे व्‍यवसाय हे मंदिरात होणाऱ्या गर्दीवर अवलंबून असतात. त्‍यामुळे त्‍यांचे व्‍यवहार ठप्प आहेत. कोरोनाचे हे संकट आणखी काय काय चित्र दाखवते, अशी भीती व्‍यावसायिक व्‍यक्‍त करत आहेत. सरकारने नियम कडक करावेत, पण संचारबंदी, लॉकडाऊनसारखे उपायअंमलात आणू नयेत, अशी अपेक्षा शेगावातील व्‍यापारी व्‍यक्‍त करत आहेत.