चांगली बातमी… संग्रामपूरचे न्यायालय आता हक्काच्या जागेत जाणार, प्रशस्त इमारत उभी राहणार!
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अखेर दिवाणी न्यायालयाच्या जागेचा प्रश्न मिटला असून, हक्काच्या जागेत लवकरच हे न्यायालय पुढील काळात कार्यान्वित होईल. २० वर्षांपासून न्यायालय भाड्याच्या जागेत होते. तहसीलदार विजय चव्हाण यांनी ७६ आर जागेचा ताबा न्याय विभागाकडे सुपूर्द केला आहे.
गेल्या महिन्यात १२ जुलैला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी गट नं. १६० मधील ७६ आर शासकीय जमीन न्यायालय इमारत व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी मंजूर केली होती. त्यानुसार काल, ३ ऑगस्टला जमीन प्रदान कार्यक्रम झाला. या जागेवर आता न्यायालयाची प्रशस्त इमारत व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभी राहतील. यावेळी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. भरड, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सौ. एल. आर. सातव, सदस्य जी. ए. क्षीरसागर, आत्माराम वसुलकार, रामेश्वर गायकी, मंडळ अधिकारी ए. एच. भिल, तलाठी विनोद भिसे, ॲड. अजने, ॲड. इंगळे, ॲड. घाटे, ॲड. गवई, ॲड. गायकी आदी उपस्थित होते.