खामगावच्या सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा… ऑक्सिजन प्लांट तातडीने सुरू करण्याचे निर्देश
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सक्रीय रुग्णांची संख्या लक्षात घेता प्राणवायूची गरज भविष्यातही अशाच पद्धतीने लागणार आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प असणे गरजेचे आहे. काम तातडीने पूर्ण करून हा प्रकल्प रुग्णांच्या सेवेत रूजू करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केली.
जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, 12 मे रोजी खामगाव सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आढावा बैठकही घेतली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील कोविड वॉर्ड, डायलिसीस विभाग, पाकगृह, कोविड प्रयोगशाळा व नव्याने प्रस्तावित प्राणवायू प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, प्रभारी तहसीलदार सुरेखा जगताप, न.प.मुख्याधिकारी श्री. आकोटकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश टापरे, गटविकास अधिकारी चंदनसिंह राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी दिनकर खिरोडकर, डॉ.सोनटक्के आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. कोरोना चाचणी, विलगीकरण कक्ष व इतर सुविधा रुणांना पुरविण्यासाठी लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले. रुग्णालयात प्राणवायू प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या कामाची पाहणी त्यांनी केली. येथील रुग्णालयात आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहे. त्याचा आढावा देखील त्यांनी घेतला. शोध, उपचार आणि लसीकरण या त्रिसूत्रीवर जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. याशिवाय सामान्य रुग्णालयाला जर काही अडचणी, समस्या असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.