खळबळजनक… चोरीला गेलेल्या मोबाइलवरून भामट्याने मुख्याध्यापकांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर टाकला अश्लील मेसेज!
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोबाइल चोरी करून भामट्याने व्हॉट्स ॲप उघडून त्यातील मुख्याध्यापकांच्या ग्रुपवर अश्लील मेसेज टाकल्याचा धक्कादायक प्रकार शेगावमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यात १ ऑक्टोबरला रात्री ९ ते ११ दरम्यान मोबाइल चोरीला गेल्याचे म्हटले आहे. चोरट्याच्या करामतीमुळे प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे काही मंडळींनी या विषयाला फोडणी देत अश्लील मेसेजचे स्क्रीनशॉट व्हायरल केले. एवढेच नाही तर हा मुद्दा विरोधात वापरण्यासाठी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
शेगाव तालुक्यातील मुख्याध्यापकांचा “HM Group’ या नावाने हा व्हाॅट्स ॲप ग्रुप होता. या ग्रुपवर प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नंबरवरून १ ऑक्टोबरला रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी अश्लील मेसेज पडला. त्यानंतर ग्रुप ॲडमिन असलेल्या कंत्राटी शिक्षकाने तातडीने सर्वांना रिमूव्ह करत ग्रुप बंद केला. मात्र या ग्रुपवरील अश्लील मेसेजचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला. त्यामुळे बिंग फुटले. ग्रुपमध्ये काही महिलाही असल्याचे सूत्रांकडून कळते. या मेसेजमुळे त्यांनाही लज्जा निर्माण झाली. सुरुवातीला प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यालाच दोषी धरून काहींनी संताप व्यक्त केला. मात्र नंतर प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हा प्रकार कसा घडला याबद्दल खुलासा केला. पोलिसांत मोबाइल हरवल्याची तक्रारही दिल्याचे सांगितले. त्यामुळे या विषयावर पडदा पडण्याची चिन्हे होती. मात्र काही मंडळींनी पुन्हा या विषयाला उचलून धरत तक्रारी केल्याने पुढे काय काय होते, याची उत्सुकता मुख्याध्यापक, शिक्षकांना लागली आहे.