कोरोना लसीवरून शेगावच्‍या सामान्य रुग्‍णालयात गोंधळ; पोलिसांना पाचारण

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाच्या कोविन अॅपवरून यशस्वीरित्या अपॉइंटमेंट घेतलेल्या 18 ते 44 वयोगटातील लोकांनाच सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर लस टोचण्यात आली. इतरांना परत पाठविण्यात आले. त्यामुळे याठिकाणी गोंधळ उडाला. अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना लस देण्यात येत नसल्यामुळे नागरिकांनी या केंद्रावरील कर्मचार्यांशी वाद घातला. शेवटी वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रेमचंद पंडीत …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शासनाच्या कोविन अ‍ॅपवरून यशस्वीरित्या अपॉइंटमेंट घेतलेल्या 18 ते 44 वयोगटातील लोकांनाच सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर लस टोचण्यात आली. इतरांना परत पाठविण्यात आले. त्‍यामुळे याठिकाणी गोंधळ उडाला. अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना लस देण्यात येत नसल्यामुळे नागरिकांनी या केंद्रावरील कर्मचार्‍यांशी वाद घातला. शेवटी वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रेमचंद पंडीत यांनी शासकीय माहिती दिल्यानंतर गोंधळ थांबला. यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्याची वेळ आली होती. हा प्रकार आज, 7 मे रोजी सकाळी घडला.

सकाळी शहरातील शेदोनशे नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी सईबाई मोटे लसीकरण केंद्रावर पोहोचले. मात्र त्याठिकाणी केवळ अपॉइंटमेंट घेतलेल्यांनाच लस देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन एकच गोंधळ उडाला. अनेकांना अपॉइंटमेंट कशासाठी घ्यावी लागते याची माहिती नसल्याने गोंधळात आणखी भर पडली.  गोंधळ एवढा वाढला की संतप्त नागरिकांना आवरण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रेमचंद पंडीत यांना पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिस आल्यानंतरही बराच वेळ गोंधळाची परिस्थिती होती. कोणी कोणाचे काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. अशात डॉ.पंडीत यांनी नागरिकांना शासकीय आदेशाबद्दल माहिती देताना सांगितले की, शासनाकडून सद्यःस्थितीत जे डोस पाठविण्यात आलेले आहेत, ते केवळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाच द्यावयाच्या सूचना आहेत. त्यातही ज्यांनी केंद्र शासनाच्या कोविन अ‍ॅपवरून लसीकरणासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांनाच लस देण्यात येईल असे सांगितले. नागरिकांना शासकीय नियमाची समज झाल्यानंतर केंद्रस्थळावरील गोंधळ निवळला आणि 18 ते 44 वयोगटातील ज्या नागरिकांकडे कन्फर्म अपॉइंटमेंट त्यांचे लसीकरण करण्यात आले.

कन्फर्म अपॉइंटमेंट असणार्‍यांनाच मिळेल लस ः डॉ.पंडीत

सद्यःस्थितीत रुग्णालयाकडे लसीचा साठा असल्याचे सांगून शासनाच्या आदेशानुसार 18 ते 44 वयोगटातील ज्या नागरिकांजवळ लसीकरणासंदर्भात शासनाच्या अ‍ॅपवरून मिळविण्यात आलेले कन्फर्म अपॉइंटमेंट पत्र असेल अशांनाच लस टोचण्यात येईल. अपॉइंटमेंट पत्र मोबाईलमध्ये असले तरी चालेल. गोंधळ टाळण्यासाठी नागरिकांनी याबाबतची नोंद घेऊनच लसीकरण केंद्रावर यावे, असे आवाहन यावेळी डॉ. पंडीत यांनी केले.

केंद्रस्थळी मोठा सूचना फलक लावावा – मागणी

नागरिकांमध्ये गोंधळ किंवा संभ्रम होऊ नये याकरिता प्रशासनाकडून लसीकरणाचा तपशील दर्शविणारा सूचनाफलक प्रवेशद्वाराजवळ लावण्यात यावा. ज्यामध्ये कोणत्या वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार आहे, कुठली लस उपलब्ध आहे, उपब्ध लसींचा साठा किती? याशिवाय शासनाच्या सूचनांची माहिती या फलकावर देण्यात यावी. जेणेकरून नागरिकांमध्ये गोंधळाची अवस्था निर्माण होणार नाही, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.