ओम साई फाऊंडेशनने जपली माणुसकी… बेवारस मृतदेहाचा केला दफननिधी!
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओळख पटत नसल्याने आणि चार दिवसही होऊनही कुणीच नातेवाइक समोर येत नसल्याने ओमसाई फाऊंडेशन आणि पोलिसांनी एकत्र येऊन मृतदेहाचा दफनविधी केला.
राष्ट्रीय महामार्गावरील नत्थानी यांच्या प्लॉटसमोर अनोळखी 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह 14 जानेवारीला आढळला होता. याबाबत माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, प्रविण डवगे, विकी रामेकर यांच्यासह नांदुरा पोलीस स्टेशनचे पो. काँ. श्री. सिरसाट, पो. काँ. गायकवाड यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. मात्र ओळख पटत नसल्याने मृतदेह मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आला होता. चार दिवस उलटूनही मृतकाची ओळख पटत नसल्याने अखेर नांदुरा पोलीस व ओमसाई फाउंडेशनच्या वतीने मलकापूर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत रितिरिवाजप्रमाणे मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला. यावेळी पो. काँ. बन्सीलाल धिरबन्सी, कमलेश बोके, किरण इंगळे, दीपक घुसर यांनी मदतकार्य केले.