एकच पोळी अन् सकाळची भाजी सायंकाळी; मलकापूर कोविड सेंटरमध्ये रुग्ण अर्धपोटी…. नगराध्यक्षांनी मग काय केले वाचा…
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांना चहा-नाश्ता तर दूरच पण पुरेसे जेवणही नाही. एक पोळी अन् भाजी..तीही सकाळचीच रात्री… रुग्ण अर्धपोटी झोपत असल्याची वार्ता नगराध्यक्ष ॲड. हरिश रावळ यांच्या कानी पडता ते कोविड सेंटरमध्ये धावले. कंत्राटदाराने याच प्रमाणात आहार देण्याचे निर्देश असल्याचे सांगून हात वर केले. त्यामुळे ॲड. रावळ यांनी मग स्वतःच रुग्णांना पोटभर जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. कॅटर्सची बोलून त्यांनी आता गरमा गरम अन् भरपेट जेवणाची सोय रुग्णांसाठी केली आहे. त्यांच्या या दातृत्वाची चर्चा सध्या मलकापुरात सुरू आहे. मलकापूरच्या कोविड सेंटरमधील रुग्णांच्या भोजनाचे कंत्राट बुलडाणा येथील व्यक्तीने घेतले असल्याचे समजते. नगराध्यक्ष अॅड.हरिश रावळ यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्ण आहाराबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली तेव्हा रुग्णांच्या तक्रारीत तथ्य आढळले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण गोरगरीब असून त्यांना अपुरे व सकाळचे शिळे अन्न खावे लागत असल्याची स्थिती न पाहवल्यानेच आपण मानवता धर्मातून त्यांना नियमित भरपेट जेऊ घालण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.