आठ-आठ दिवस पाणी नाही…मग नळपट्टी भरून काय उपयोग?; ग्रामस्थांचा सवाल, पातोंडा(पेडका) ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील पातोंडा पेडका येथे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे पाणीटंवाई निर्माण झाली आहे. आठ-दहा दिवस नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. नळपट्टी भरूनही पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
पातोंडा पेडका ही 7 सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर पुरुषोत्तम लगर, गजानन मधुकर तायडे, विनोद किसन पाटील यांच्याकडे काही गावकऱ्यांनी तक्रार केली. त्यावर ग्रामसेवक व सरपंच, उपसरपंचांनी सांगितले, की नळपट्टी बाकी असल्यामुळे नळ बंद आहे. पण अनेक लोकांनी नळपट्टी आतापर्यंत वेळेवर भरून सुद्धा त्यांना पाणी मिळत नाही. दुसरीकडे अनेकांनी चार- पाच वर्षांपासून घरपट्टी, नळपट्टी भरलेली नाही. अशा लोकांमुळे वेळेवर नळपट्टी भरणाऱ्या लोकांना सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर पुरुषोत्तम लगर, गजानन मधुकर तायडे व विनोद किसन पाटील यांनी ग्रामपंचायतीकडे ज्यांनी घरपट्टी भरली नसेल त्यांचे नळ कनेक्शन कट करावे व ज्यांनी वेळेवर नळपट्टी भरलेली आहे त्यांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. मात्र तरीही आतापर्यंत ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्याकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे पातोंडा येथील वेळेवर नळपट्टी भरणारे नागरिक संतप्त झाले आहेत. असे असेल तर आम्ही वेळेवर नळपट्टी भरून आमचा काय फायदा, अशी प्रतिक्रिया कैलास काटोले, भीमराव तायडे, सदाशिव लगर व इतर गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर पुरुषोत्तम लगर यांच्याकडे केली आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करून या उन्हाळ्याच्या दिवसात लवकरात लवकर ग्रामपंचायतीमार्फत पाणी पुरवठा चालू करावा, अशी मागणी लगर यांनी ग्रामसेवक ,सरपंच, उपसरपंच, यांना केली आहे.