असाही पुढाकार… पत्रकारांना वैद्यकीय, शैक्षणिक कामासाठी प्रेस क्लब करणार ५ हजारांची मदत!
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी शेगाव प्रेस क्लबने कल्याणकारी पाऊल उचलले असून, आर्थिक अडचणीत असलेल्या पत्रकारांसाठी वैद्यकीय तसेच पाल्यांच्या शैक्षणिक कामासाठी तात्काळ ५ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल उंबरकार यांनी जाहीर केला आहे.
वृत्तपत्र क्षेत्रात काम करताना पत्रकार बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पत्रकार हे लोकांचे हीत जोपासण्याचे काम करतात. सातत्याने लोकांसाठी काम करत असताना पत्रकार स्वतःच्या गरजा, कुटूंबियांच्या अडचणी, प्रगतीकडे दुर्लक्ष करतो. संकटात विचाराशिवाय पर्याय नसतो. संकटकाळात पत्रकार बांधवांना एकटेपणाची जाणीव होऊ नये, त्याला आधार मिळाला पाहिजे, पत्रकार बांधवांचा अपघात झाला किंवा स्वतः वा कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ ५ हजार रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच पत्रकार त्यांच्या पाल्यांची आर्थिक अडचणीमुळे शालेय फी भरून शकत नाही किंवा शालेय साहित्य,गणवेशासाठी तात्काळ ५ हजार रुपयांची मदत प्रेस क्लबतर्फे देण्यात येणार आहे.
सांत्वनपर भोजन व्यवस्था
शेगाव शहरातील व तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या परिवारातील सदस्यांचे निधन झाल्यास संबंधित बांधवांचे घरी पहिल्या दिवशी सांत्वनपर भोजन व्यवस्था प्रेस क्लब शेगाव कडून करण्यात येणार आहे.
पत्रकार मानधन योजना
प्रेस क्लब शेगाव या संस्थेअंतर्गत पत्रकार बांधवांसाठी अल्पशी मदत होण्याचे दृष्टीने पत्रकार मानधन योजना हा अभिनव उपक्रम राबविण्याचा मानस आहे.