अरेच्चा, ‘राष्ट्रवादी’च्या बॅनरवर चक्क ‘थॅंक्यू मोदी सरकार’! शेगावमध्ये होतेय चर्चा
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे प्रदेश सचिव सौ. नंदाताई पाऊलझगडे यांनी लावलेल्या एका बॅनरची सध्या शहरभर चर्चा होत आहे. या बॅनरवर चक्क ‘थॅंक्यू मोदी सरकार’ असे आभार मानण्यात आले आहे.
गॅस दरवाढीचा विचार करता सिलिंडरची चूल करून त्यावर स्वयंपाक करणाऱ्या महिलेचे चित्र या बॅनरवर आहे. सततच्या गॅस दरवाढीबद्दल पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यात आले आहेत. काही दिवस अगोदर महिला प्रदेश सचिव सौ. नंदाताई पाउलझगडे यांनी याच चौकात महिलांना घेऊन रस्त्यावरच चुलीवर स्वयंपाक करून चक्क बेसन भाकरीचा स्वयंपाक आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली होती. सौ. नंदाताई पाऊलझगडे या वेगवेगळ्या आंदोलनांसाठी संपूर्ण जिल्ह्यात ओळखल्या जातात. याअगोदर सुद्धा त्यांनी अनेक महिलांना घेऊन वाढत्या महागाईच्या विरोधात अनेक यशस्वी आंदोलने केली आहेत.