अरेच्चा… बेरोजगाराने एसडीओंकडे मागितली वरली, मटका सुरू करण्याची परवानगी!; जळगाव जामोद येथील प्रकार
जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एका बेरोजगाराने चक्क वरली मटका सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी योग्य ती फी भरण्याची सुद्धा तयारी त्याने दर्शवली आहे. उपविभागीय अधिकार्यांकडे त्याने हा अर्ज केला आहे. मंगेश हरिभाऊ तेलंगडे असे या युवकाने नाव आहे. तो जळगाव जामोदचा रहिवासी असून, त्याने अर्जात म्हटले आहे, की जळगाव जामोद शहरात काही राजकीय लोकांचे वरली, मटका, तितली धंदे सुरू असून, अवैध रेती वाहतूक, अवैध दारूची विक्रीही मोठ्या प्रमाणात खुलेआम सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण तालुक्यात बेरोजगारीला पर्याय उपलब्ध झाल्याचे दिसून येते. तालुका व शहरात भाजीपाला दुकाने कमी आणि वरली मटक्याची दुकाने जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी सुद्धा बेरोजगार युवक असून, कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी मला सुध्दा वरली, मटका आणि तितली, भवरा चालविण्यास आपल्या पोलीस विभागाची रितसर परवानगी देण्यात यावी. यासंबंधी योग्य ती फि भरण्यास मी तयार आहे, असे त्याने अर्जात म्हटले आहे. आपणाकडून समाधान, सहकार्य न झाल्यास उदासीनतेपोटी मला कुटूंबासह आत्महत्या करण्याची परवानगी तरी देण्यात यावी, अशी इशारावजा मागणीही त्याने केली आहे.