अटाळी ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी खामगावमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अटाळी ग्रामपंचायतीने विविध कामांत तब्बल ७० लाख रुपयांचा घोटाळा केला असून, या संपूर्ण कामांची चौकशी करावी या मागणीसाठी अटाळी येथील तरुण रुपेश पुरुषोत्तम खेकडे यांनी आज, ६ सप्टेंबरला दुपारपासून खामगावमध्ये उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जोपर्यंत दोषी पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे खेकडे यांनी सांगितले. १४ व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या जलवाहिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी. जुनी जलवाहिनी अस्तित्वात असताना तिच्या दुरुस्तीच्या नावावर नवीन जलवाहिनी टाकून लाखो रुपयांचा अपहार झाल्या प्रकरणाची चौकशी करावी. मुत्रीघर, नाली बांधकाम, रस्ता बांधकाम, पेव्हर ब्लॉक, अंगणवाडी दुरुस्ती व इतर कामांतही गैरव्यवहार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्याने केला आहे.