क्या बात! गाव करी ते राव काय करी? निपाणा वासीयांनी करून दाखवलं! सर्वत्र होतेय कौतुक....
May 26, 2025, 20:01 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): म्हणतात न गाव करी ते राव काय करी.. हो अगदी याच म्हणी प्रमाणे खामगाव तालुक्यातील निपाणा वासियांनी करून दाखवलं...ऐन पेरणीच्या तोंडावर गावातील शेतकरी बांधवांनी एक लाख रुपये लोकवर्गनी गोळा केली अन् वर्षानुवर्षे खड्डे पडलेला रस्ता एका झटक्यात नीटनेटका केला.
खामगाव तालुक्यातील निपाणा गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वर्षानुवर्ष पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्याची दुराअवस्था झालेली होती. पाण्याचा दुर्गंध येत होता. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या, रस्त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरील घाणीचा,तुंबलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. सासलेल्या पाण्यामुळे गावात आरोग्याचे समस्या निर्माण झाली होती. याबाबत ग्रामपंचायतकडे मागील काही वर्षापासून वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतने आतापर्यंत रस्त्याच्या बाबतीत कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. शेवटी ग्रामपंचायतची वाट न पाहता गावातील तरुण सरसावले त्यांनी चक्क एक लाख रुपये लोक वर्गणी गोळा केली. गावात जाणारा मुख्य रस्ता रातोरात नीटनेटका केला आहे. या तरुणांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.