नांदुऱ्याकडून जळगाव जामोद कडे जाणाऱ्या वाहनांची तासंतास कोंडी!आतापर्यंत राजकीय मंडळींची फक्त आश्वासनं,उड्डाणपूल कधी?

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा कडून जळगाव जामोद कडे ये - जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नांदुरा येथील रेल्वे गेट जवळ तासंतास वाहनांची कोंडी होत आहे.अनेक वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे..

नांदुरा रेल्वे गेट दिवसातून किती वेळ बंद असते याचा नेम नाही.रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्यांच्या रांगांच - रांगा असतात. त्यामुळे साधं स्थानिकांना इकडून तिकडे रस्ता जरी ओलांडायचा म्हटलं तरी त्यांचा कितीतरी वेळ या रस्त्याने जातो. शाळकरी मुलांना,रुग्णांना सुद्धा या ट्राफिकमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. दरवेळी प्रत्येक राजकीय पक्षांच्या आश्वासनामध्ये एकच गोष्ट असते येथे उड्डाणपूल होणार, मात्र केव्हा? या प्रश्नाचे उत्तर कुठेच मिळत नाही. खरं तर हा फक्त ट्राफिकचा प्रश्न नाही तर प्रश्न आहे. वाहनधारकांच्या वेळेचा, संयमाचा,प्रशासनाच्या उदासीनतेचा...राजकीय मंडळींना निवडणुकीच्या काळात इथं माईक लावायला जागा सापडते मात्र दररोज रेल्वे गेट ओलांडणाऱ्या जिवंत माणसांच्या त्रासाकडे पाहायला वेळ आहे की नाही? असा प्रश्न या रस्त्याने दररोज हजारो ये-जा करणाऱ्या वाहनधारकांच्या, स्थानिक नांदुराकरांच्या मनात येत आहे.

प्रवासी म्हणतात...


मी तब्बल दोन तास या ट्रॅफिक मध्ये अडकलो. मला जळगाव जामोदला महत्वाच्या कामासाठी जायचे होते. मात्र १० ते १२ दोन तास ट्रॅफिक मध्ये अडकलो, १ वाजता जळगाव जामोद येथे पोहोचलो.उशीर झाल्याने माझे महत्वाचे हॉस्पिटलचे काम झाले नाही..

  – सदानंद आपटे,  प्रवासी नांदुरा