संग्रामपूर तालुक्यातील सगोडा गावात दुर्दैवी घटना; हृदयविकाराच्या झटक्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू – गावात शोककळा

 

 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील सगोडा गावात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनांनी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक शेतकरी शेतात मजुरांना मजुरी देत असताना तर दुसरे शेतकरी घरातच अचानकपणे मृत्यूमुखी पडले. या दुर्दैवी घटना २ मे रोजी दुपारच्य सुमारास घडल्या.

पहिली घटना सगोडा शिवारात घडली. संतोष लक्ष्मण हागे (वय ४०) या शेतकऱ्याने बटाईने घेतलेल्या चार एकर बागायती शेतीत उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले होते. पीक काढणीचा काम सुरू असताना ते दुपारी साडेचारच्या सुमारास मजुरांना मजुरी देत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि शेतातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

दुसरी घटना प्रल्हाद लासूरकार (वय ७०) या ज्येष्ठ शेतकऱ्याच्या बाबतीत घडली. ते आपल्या घरीच असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. एकाच दिवशी आणि काही तासांच्या अंतराने दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे सगोडा गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.