उद्या"श्रीं"चे मंदीर रात्रभर राहणार खुले..! आषाढी एकादशीचे निमित्त... शेगावात भाविकांची होणार गर्दी!

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे श्री संत गजानन महाराज मंदिर, शेगाव येथील मंदिर आषाढी एकादशीनिमित्त शनिवार, दि. ५ जुलै रोजी भाविकांसाठी संपूर्ण रात्रभर खुले राहणार आहे. पंढरपूरला जाऊ न शकलेल्या भाविकांसाठी शेगाव हे श्रद्धेचे केंद्र ठरते. यामुळे मराठवाडा, खान्देश व विदर्भातील विविध जिल्ह्यांतून हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत आहेत.

संस्थानच्या वतीने भाविकांच्या सुविधांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दि. ६ जुलै, रविवार रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी श्रींच्या समाधीस्थळी दिवसभर दर्शनासाठी भाविकांना मुक्त प्रवेश देण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिरात काकडाभजन, दुपारचे प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, तसेच श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तन सेवा होणार आहे.
भाविकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी दर्शनबारी, श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण व्यवस्था, तसेच संस्थानच्या भक्तनिवासात अल्पदरातील निवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिर परिसरात स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्यात आले असून सेवेकरी सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.
संस्थानच्यावतीने भाविकांच्या सुरळीत व समाधानी दर्शनासाठी सर्वतोपरी सोयीसुविधांची तयारी करण्यात आली आहे. या धार्मिक वातावरणात भाविकांची श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा संगम अनुभवता येणार आहे.