खामगावात चोरटे पोलिसांना जुमानत नाहीत! सुटाळा भागात चोरट्यांचा सुळसुळाट...! २ घरे फोडली..

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरालगत येत असलेल्या सुटाळा व वाडी परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. दोन्ही घरामधून चोरट्यांनी २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाडी येथील विनायक नगर भागात राहणाऱ्या मोहिनी संतोष वानखेडे ह्या घराला कुलूप लावून भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोट्यांनी भर दिवसा त्यांच्या घराचे मागील कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली ५ ग्रॅमची सोन्याची पोत तसेच सोन्याची ५ ग्रामची अंगठी असा एकूण साठ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची चर्चा सुरू असताना काल ३१ जानेवारी रोजी सुटाळा खु. येथे चोरट्याने घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली. सुटाळा येथील देवानंद भाऊराव देशमुख हे इंदूर येथे नातेवाईकांकडे तेरवीच्या कार्यक्रमाकरिता गेलेले होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आज प्रवेश केला. व लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व नगदी असा ऐकून १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या दोन्ही घटनांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.