चोरट्यांची सा. बांधकाम विभागाच्या सूचना फलकांवर वक्रदृष्टी!; पिंप्री गवळी–चितोडा रोडवरील तब्बल ६४ फलक लंपास! ३७ हजार ९४८ रुपयांची शासकीय मालमत्ता चोरीला; वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर....

 
 खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना दिशा दाखवणारे आणि सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाचे असलेले सूचना व दिशादर्शक फलकच चोरट्यांनी पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंप्री गवळी फाटा ते चितोडा गावादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे तब्बल ६४ सूचना फलक अँगलसह उपटून चोरीला गेले आहेत. ३७ हजार ९४८ रुपये किमतीच्या या शासकीय मालमत्तेवर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याने खळबळ उडाली आहे.

पाच महिन्यांत ६४ फलक गायब!

मिळालेल्या माहितीनुसार, २६ मे ते ११ ऑक्टोबर या कालावधीत पिंप्री गवळी फाटा ते चितोडा गावादरम्यान लावण्यात आलेले सूचना व दिशादर्शक फलक चोरीला गेले. विशेष म्हणजे, हे फलक केवळ उखडून नेण्यात आले नाहीत, तर त्यांचे अँगलही काढून नेण्यात आले आहेत. त्यामुळे ही शासकीय मालमत्ता नेमकी कोणी आणि कशासाठी लंपास केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फलक गायब; अपघाताचा धोका वाढला!

महामार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. अशा रस्त्यांवर वाहनधारकांना योग्य दिशा मिळावी, तसेच प्रवासादरम्यान आवश्यक सूचना समजाव्यात, यासाठी हे फलक महत्त्वाचे असतात. मात्र, फलकच गायब झाल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. परिणामी अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या चोरीकडे केवळ शासकीय मालमत्तेच्या नुकसानीपुरते पाहून चालणार नाही, तर वाहनधारकांच्या सुरक्षेचाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

कनिष्ठ अभियंत्यांची पोलिसांत तक्रार

या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ऋषीकेश देशमुख यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या फलकांची एकूण किंमत ३७ हजार ९४८ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण राऊत करीत आहेत. आता या फलकांची चोरी करणारे कोण, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.