भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर ; अवकाळीचाही शेतकऱ्यांना फटका ;भारत पाकिस्तान च्या युद्धवरही केले भाकीत..
May 1, 2025, 12:24 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि पारंपरिक भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित आज सूर्योदयाच्या वेळी जाहीर करण्यात आले. सकाळी सहा वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाच्या वर्षाची पावसाळी, कृषी आणि देशपातळीवरील परिस्थितीची भविष्यवाणी केली.
भविष्यवाणीप्रमाणे यंदा जून महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. जुलैमध्ये पावसाची परिस्थिती सरासरीच्या आसपास राहील. मात्र ऑगस्टमध्ये प्रचंड पावसाचा अनुभव येणार असून, अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातही पावसाचे प्रमाण अधिक राहील. तथापि, याच महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
पिकांच्या उत्पादनाबाबत भाकीतात म्हटले आहे की, गहू, ज्वारी, तांदूळ व इतर पिकांचे उत्पादन मोघम स्वरूपाचे राहील. काही प्रमाणात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता असली, तरी अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी काळात नियोजनपूर्वक शेती करावी, असा अप्रत्यक्ष इशारा या भाकितातून दिला आहे.
राजकीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थितीविषयी देखील घट मांडणीतून भाकीत करण्यात आले आहे. देशाचा राजा (सत्ताधारी नेतृत्व) कायम राहणार असले तरी, परकीयांचे आक्रमण, आर्थिक अडचणी व दबावामुळे राजकीय नेतृत्वावर ताण येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावपूर्ण संबंधांबाबतही भाकित देण्यात आले असून, प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता कमी आहे, मात्र तणाव कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भेंडवळची घट मांडणी ही केवळ धार्मिक विधी नसून अनेकांनी तिच्याकडे सामाजिक आणि भविष्यातील मार्गदर्शन म्हणून पाहिले जाते. यंदाच्या भाकितांमुळे शेतकरी, राजकीय मंडळी आणि सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.