

"ड्राय डे"लाच दारूचा धंदा; खामगावमध्ये पोलिसांची कारवाई, देशी-विदेशी दारूचा साठा जप्त!
Apr 14, 2025, 14:07 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर 'ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. असे असतानाही खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान खामगाव पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर, शहर पोलिसांनी सिंधी कॉलनीतील एका घरावर छापा टाकून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.
सिंधी कॉलनीतील लकी सुरेश बुलानी यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. त्याठिकाणी सुमारे २५ हजार रुपयांचा दारू साठा आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल ताब्यात घेऊन बुलानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केली. "ड्राय डे"च्या दिवशीच असा गैरव्यवहार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.