बिबट्याला लागली चटक! मुक्त संचार करतोय अन् शेतकऱ्यांच्या बकऱ्या फस्त करतोय..! पशुपालक अडचणीत! रोहीणखेड परिसरात शेतकऱ्यांना वैताग...
Jan 28, 2025, 14:42 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. बिबट्याने रोहिणखेड, उबाळखेड शिवारात माणसावर हल्ला चढवित जखमी केले आहे. सारोळा पीर येथे दोन बकऱ्यांवर हल्ला चढवित त्यांचा फडसा पाडल्याने शेतकऱ्यांचे २० हजारांचे नुकसान झाले आहे. सदर घटना २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
सारोळापीर येथील शेतकरी रविंद्र हरीशचंद्र साबळे यांनी त्यांच्या गोठ्यात बकऱ्या बांधलेल्या होत्या. २६ जानेवारी रोजी बिबट्याने सदर बकऱ्यांवर हल्ला चढवित त्यांचा फडशा पाडला. यामुळे साबळे यांचे अंदाजे २० हजारांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पडोळ यांना देण्यात आली.
वनपाल एस.एम. जगताप, वनरक्षक आर.बी. शिरसाट चालक जाधव, कर्मचारी तायडे घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला आहे. गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शेतक ऱ्यांनी शेतात जाताना कोणीही एकटे जावू नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. परिसरात कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनपाल शिरसाट यांनी दिली आहे..