दुकानातून दुर्गंधी येताच उलगडली घटना; खामगावात टेलरचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Jul 24, 2026, 10:31 IST
खामगाव (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील वसंतवाडी मेन रोड परिसरात गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील एका टेलरच्या दुकानात वसंता उटाळे (वय ५५) यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंतवाडी मेन रोडवरील टेलरच्या दुकानातून गुरुवारी असह्य दुर्गंधी येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संशय आल्याने काही नागरिकांनी दुकानाची पाहणी केली. यावेळी दुकानाच्या आत वसंता उटाळे हे मृतावस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती तत्काळ खामगाव शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे वसंतवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खामगाव शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.