बोरी-अडगाव पुलाच्या खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कुटुंब ६ दिवसांपासून रस्त्यावर!; प्रशासनाला उपोषणस्थळी भेट द्यायला वेळ मिळेना..

 
 खामगाव (भागवत राऊत : बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): बोरी-अडगाव पुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात सोना जगन सोनवणे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी पत्रकार सुधीर टिकार आणि जगन काशीराम सोनवणे हे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.

सहा दिवस उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. न्यायासाठी एका कुटुंबाला आमरण उपोषण करावे लागते आणि सहा दिवस प्रशासन दखल घेत नसेल, तर प्रशासन उपोषणकर्त्यांच्या मरणाची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला असून, दोषींवर कारवाई करावी आणि अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. खरं तर एखाद्या गरिबाचे मरण एवढे स्वस्त आहे का? की प्रशासनाला पीडित कुटुंबाच्या उपोषणस्थळी भेट द्यायलाही वेळ मिळत नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.