"टकल्या व्हायरस" वर प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर! शेगाव तालुक्यातील ६ गावांत आढळले ५१ रुग्ण! ७ रुग्णांना अकोल्याला पाठवले...
Jan 8, 2025, 19:49 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील काही गावांत एक अजब गजब आजार समोर आला आहे.. आजाराची लागण झालेल्यांचे तीन दिवसांत टक्कल पडते. आधी डोक्यात खाज, दुसऱ्या दिवशी केसगळती आणि तिसऱ्या दिवशी टक्कल असे या आजाराचे स्वरूप असल्याचे गावकरी सांगत आहेत..दरम्यान याबाबतचे वृत्त माध्यमांमध्ये प्रकाशित होताच आरोग्य यंत्रणादेखील अलर्ट मोडवर आली आहे.. शेगाव तालुक्यातील ६ गावांमध्ये तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५१ रुग्ण आढळून आले आहेत..
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राम गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार बोंडगाव येथे १६, कालवड येथे १३, कठोरा येथे ७ , भोनगांव येथे ३, हिंगणा वैजिनाथ येथे ६ तर घुई गावांत ७ असे एकूण या अज्ञात आजाराचे एकूण ५१ रुग्ण आढळले आहेत. या गावांमधील पाण्याची नमुने जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याशिवाय ५१ रुग्णांपैकी ७ जणांना तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान काही त्वचारोग तज्ञांनी रुग्णांची पाहणी करून प्राथमिक निदान "फंगल इन्फेक्शन" असू शकते असे सांगितले आहे.