सहा महिन्यातच खड्डेमय झाला टेंभुर्णा-खामगाव रस्ता; अखेर 'निकृष्ट खड्डे भरो मोहीम' जोरात..!
Sep 20, 2025, 09:57 IST
खामगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :टेंभुर्णा-खामगाव रस्त्याचे काम अवघ्या चार महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही महिन्यांतच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. सध्या या मार्गावर ‘अत्यंत निकृष्ट खड्डे भरो मोहीम’ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
टेंभुर्णा-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर शासनाचे लाखो रुपये अक्षरशः पाण्यात गेले आहेत.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित ठेकेदारावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.खामगाव-अकोला नॅशनल हायवे महामार्गाशी जोडणारा टेंभुर्णा पर्यंतचा हा मार्ग परिसरातील महत्त्वाचा संपर्क रस्ता आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांची याच रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने आठ महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण केले होते.
मात्र पावसाळा सुरू होताच रस्त्यावर खड्डे पडू लागले. पावसाचे पाणी
ठिकठिकाणी खड्ड्यांत साचत असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.निकृष्ट काम झाल्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेल्याची ओरड आता होऊ लागली आहे.
कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही फक्त पाच-सहा महिन्यातच रस्ते खराब होत असतील तर तो निधी नेमका कुठे जातो? असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.दरम्यान, काही दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना मुरुम टाकून व थातूरमातूर काँक्रीट ओतून बुजवण्याची मोहीम सुरू केली आहे.