आर.आर. नेवरे मास्तरसाठी विद्यार्थ्यांचा व पालकांचा टाहो! मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

 
 खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : "आर.आर. नेवरे मास्तर यांची बदली रद्द करा," अशी मागणी करत शिर्ला येथील विद्यार्थी व पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. "जोपर्यंत नेवरे मास्तरांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत आमची मुले शाळेत जाणार नाहीत," असा इशारा पालकांनी जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 


खामगाव पंचायत समिती अंतर्गत शिर्ला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आर.आर. नेवरे हे गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी शासनाच्या नियमानुसार त्यांची बदली इतर शाळेत करण्यात आली. याला विरोध करत शिर्ला येथील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावकरी व पालकांनी मिळून मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांना निवेदन दिले. 


नेवरे यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील सहकारी शिक्षकांनी भौतिक सुविधा उभारण्यासह शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. "मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा" उपक्रमात शाळेला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच विविध उपक्रमांमधून ग्रामस्थांचा सहभाग घेऊन शाळेचा दर्जा उंचावण्यात आला. शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढवण्यातही नेवरे मास्तरांचे मोठे योगदान असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर नेवरे यांची ऑनलाईन बदली झाल्याने गावकरी व पालक आक्रमक झाले आहेत. "या बदल्यामुळे आमच्या गावाचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे," अशी नाराजी व्यक्त करत पालकांनी स्पष्ट केले की, नेवरे मास्तर परत येईपर्यंत विद्यार्थी शाळेत जाणार नाहीत.या प्रकरणात आता मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.