साप वाचवायला गेलेल्या सर्पमित्राचाच मृत्यू; सर्पदंशाने खामगावात दुर्दैवी घटना...
मंगेश प्रकाश कांबळे (वय ३२) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात पकडलेला साप जंगलात सोडण्यासाठी ते जनुना तलाव परिसरात गेले होते. यावेळी सापाला सोडत असताना अचानक त्याने मंगेश कांबळे यांना दंश केला.
सर्पदंशानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अकोल्याकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, अकोल्याला हलवित असताना पैशांच्या कारणावरून रुग्णवाहिका चालकाने टेंभुर्णा येथून रुग्णवाहिका परत खामगावच्या सामान्य रुग्णालयात आणल्याचा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे. या विलंबामुळेच सर्पमित्राचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात तीव्र संताप व्यक्त केला.घटनेची माहिती मिळताच नगरसेवक राम मिश्रा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी नातेवाइकांनी रुग्णवाहिका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.रुग्णालय परिसरात या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.