शेतकऱ्याने आपल्या घामाने पिकवलेल्या धान्याच्या मापात पाप!;क्विंटल'मागे सात किलो तूर जास्त मोजले.. खामगाव कॉटन मार्केट मधील धक्कादायक घटना..!
Jan 10, 2025, 17:19 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्याने आपल्या रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या धान्याच्या मोजणीत पाप करून क्विंटल मागे सात किलो तूर जास्त मोजण्याचा धक्कादायक प्रकार खामगाव कॉटन मार्केटमध्ये उघडकीस आला आहे.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील परवानाधारक अडते हे गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांनी स्वतःच्या घामाने पिकवलेल्या मालाचे मोजमाप करताना दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर मापात पाप करीत असल्याची घटना समोर आली आहे. मोजमाप करताना एका क्विंटल मागे बारदानासकट आठ किलो जास्तीचा शेतमाल मोजून शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक करीत आहेत.या घटनेने शेतकऱ्यांमध्ये तीव्र आक्रोश पहावयास मिळाला आहे. खामगाव बाजार समिती संबंधित अडत्याविरोधात काय कारवाई करते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाबुराव वामन इंगळे रा. महाळुंगी ह.मु. भंडारी ता. खामगाव या शेतकऱ्याने आज १० जानेवारी रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी आणला होता ४० क्विंटल शेतमालातील मोजणी सुरू झाली सावता अडत दुकानाच्या अडत्या कडून शेतमालाची मोजणी सुरू असताना सहा क्विंटल शेतमाल मोजणी दरम्यान क्विंटलच्या वजनाच्या आठ किलो अतिरिक्त वजन ठेवून जास्तीच्या मालाची लूट होत असल्याची घटना शेतकऱ्यांच्या निर्देशात आली त्याने आक्रोश करून बाजार समिती मधील सर्व शेतकरी गोळा केले. यावेळी बाजार समितीच्या संचालकांनी दखल घेत संबंधित अडते, शेतकऱ्याला कार्यालयात बोलावून घेतले याप्रकरणी सभापती सुभाष पेसोडे यांनी त्वरित दखल घेत सावता ट्रेडस याच्या दुकानाचा परवाना रद्द करण्याचे निदेश दिले आहेत.