Shocking! सिझर करताना पोटात राहिली बँडेज पट्टी; महिलेचा मृत्‍यू

खामगावच्या सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांविरुद्ध पतीची पोलिसांत तक्रार खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिझर करताना पोटात बँडेज पट्टी राहिल्याने पत्नी दगावल्याची तक्रार कवळठ (ता. संग्रामपूर) येथील परमेश्वर बळीराम पाखरे (२६) या तरुणाने खामगाव शहर पोलीस ठाण्यात केली आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडून या तक्रारीवर अहवाल मागविण्यात येणार असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी …
 

खामगावच्‍या सामान्य रुग्‍णालयातील डॉक्‍टरांविरुद्ध पतीची पोलिसांत तक्रार

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिझर करताना पोटात बँडेज पट्टी राहिल्याने पत्‍नी दगावल्याची तक्रार कवळठ (ता. संग्रामपूर) येथील परमेश्वर बळीराम पाखरे (२६) या तरुणाने खामगाव शहर पोलीस ठाण्यात केली आहे. रुग्‍णालयाच्‍या वैद्यकीय अधीक्षकांकडून या तक्रारीवर अहवाल मागविण्यात येणार असून, अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर दोषींविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना दिली.

परमेश्वर पाखरे यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की पत्‍नी सौ. पूजाला प्रसुतीसाठी ७ एप्रिलला खामगावच्‍या सामान्य रुग्‍णालयात दाखल केले होते. मात्र नॉर्मल डिलिव्‍हरी न झाल्‍याने पत्‍नीचे सिझर करावे लागेल असे डॉक्‍टरांनी सांगितले. याच दिवशी संध्याकाळी सिझर करण्यात आले. मुलगा जन्‍माला आला. ११ एप्रिलपर्यंत पत्‍नी रुग्‍णालयातच भरती होती. सिझरनंतर पोटात दुखत असल्याने डॉक्‍टरांनी तिला ११ एप्रिलला अकोला येथे रेफर केले. १९ एप्रिलपर्यंत अकोला येथील सामान्य रुग्‍णालयात उपचार सुरू होते. नंतर तिला डिस्‍चार्ज मिळाला. पत्‍नीला घरी आणल्यानंतर तिच्‍या पोटाचा त्रास वाढत गेल्याने १० जूनला खामगाव येथील खासगी डॉक्‍टरांकडे उपचारासाठी आणण्यात आले. त्‍यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफीत बँडेज पट्टी पोटात असल्याचे दिसून आले. त्‍यामुळे डॉक्‍टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले.

१२ जूनला संध्याकाळी मोताळा येथील खासगी डॉक्‍टरांकडे ऑपरेशन केले असता पत्‍नीच्‍या पोटात बँडेज पट्टी आढळली. मात्र नंतर पत्‍नीच्‍या पोटात असह्य वेदना सुरू झाल्‍याने बुलडाणा येथील खासगी रुग्‍णालयात हलविण्यात आले. रात्री ११ च्‍या सुमारास पत्‍नी पूजाचा उपचारादरम्‍यान बुलडाण्यात मृत्‍यू झाला. पत्‍नीच्‍या मृत्‍यूस कारणीभूत कागदपत्रे गोळा केल्यानंतर तक्रार देत असल्याचे पाखरे यांनी म्‍हटले आहे. खामगाव सामान्य रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व संबंधित डॉक्‍टर, कर्मचारी यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्याची मागणी त्‍यांनी तक्रारीत केली आहे. तक्रारीच्‍या प्रती पोलीस अधीक्षक, पालकमंत्री, जिल्हा शल्यचिकित्‍सकांना पाठविण्यात आल्या आहेत.