भक्तीरसात धावून निघाले शेगाव! श्रींचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने रवाना! ४ जुलैला पोहोचणार पंढरीत...
Jun 2, 2025, 11:35 IST
शेगाव (भागवत राऊत, बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 'गण गण गणात बोते'च्या गजरात, शेगाव येथील श्रींचा पालखी सोहळा आज पहाटे पंढरीच्या दिशेने रवाना झाला. यावेळी मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती होती. शेगावच्या श्रींची पालखी भक्तिरसात न्हालेल्या सातशे वारकऱ्यांसह पंढरपूरच्या मार्गावर निघाली.
आज,२ जूनच्या पहाटे हा ५७ वा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. या सोहळ्यात सातशे वारकऱ्यांसह दोनशे पन्नास पताकाधारी, दोनशे पन्नास टाळकरी आणि दोनशे सेवेकरी यांचा सहभाग आहे.
मंदिराच्या परिसरात 'गण गण गणात बोते'च्या गजरात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पूजन झाले. या पालखी सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, ती ३३ दिवसांच्या प्रवासात तब्बल ७०० किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहे.४ जुलैला ही पालखी पंढरपूरला पोहोचेल. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने पालखीच्या मुक्कामाची व्यवस्था पंढरीत करण्यात आलेली आहे..