तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही - रविकांत तुपकर आक्रमक..!कर्जमुक्ती व पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा शेगावातून एल्गार..!तुपकरांची बैलगाडीतून शेगावात मिरवणूक..!शेतकऱ्यांनी केले जंगी स्वागत

 
 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन- कापसाला भाव नाही,  कांद्याला भाव नाही,  उसाचाही  प्रश्न बिकट आहे., नुकसान भरपाई नाही,  पेरणी तोंडावरील परंतु पीककर्ज नाही,  कर्जमाफी नाही आज राज्यातील शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी  एल्गार पुकारला आहे.  सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळात  मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी  संत नगरी शेगाव येथे बोलताना दिला.  शेगाव येथील माहेश्वरी भवन येथे आयोजित एल्गार मेळाव्याला  शेतकरी आणि तरुणांचा प्रचंड प्रतिसाद  दिसून आला. 
तुपकर

 संत नगरी शेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आज १० मे रोजी एल्गार मेळावा पार पडला.  या मेळाव्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले.  यावर्षी पाऊस वेळेवर  वेळेवर येऊ द्या,  पिके चांगली राहू दे आणि  शेतकऱ्यांच्या घरात  चांगले उत्पन्न येऊ दे,  या सोबतच  सोयाबीन आणि कापसाला चांगले दर देण्याची सद्बुद्धी  व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची सद्बुद्धी या सरकारला दे अशी प्रार्थना  रविकांत तुपकर यांनी संत गजानन महाराजांच्या चरणी केली.
 पुढे बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले की, 
 मी गेल्या 22 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी संघर्ष  करीत आहे, त्याचेच फळ म्हणून या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांनी मला लोकसभेत अडीच लाख मते दिली. एका अपक्ष उमेदवाराने अडीच लाख मते  घ्यावी ही  बुलढाण्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
 


तर चित्र वेगळे असते...

घाटाखालील  मतदारांनी मला साथ दिली असती तर आज चित्र वेगळे असते. परंतु या भागातील लोकांना  निकालानंतर पश्चाताप झाला.  शेतकरी हीच माझी जात आहे आणि शेतकरी हाच माझा धर्म आहे.  मी अजून केवळ शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठीच लढत आलो आणि यापुढेही  शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठीच लढत राहील,  याची ग्वाही गजाननाच्या साक्षीनं देतो असेही  रविकांत तुपकर यावेळी म्हणाले. ज्यांना निवडून दिलं त्यांनी आजपर्यंत जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही. आरोग्य मंत्री आहेत परंतु  जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. केस गळती,  नख  गळतीबाबत अजूनही संशोधन झालं नाही.  ते केंद्रीय मंत्रीचं काय पंतप्रधान जरी झाले तरी या जिल्ह्याचा जे काही भलं करू शकत नाही असा टोला देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी लगावला. ते म्हणतात मी मोदींच्या जवळ आहे जर ते मोदींच्या एवढे जवळ आहेत तर मग पिकविमा बद्दल, सोयाबीन कापूस भावाबद्दल शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल एक शब्द इथे का बोलत नाही असा सवालही यावेळी रविकांत तुपकर यांनी केला.  

तुपकर


पिकविम्याचा प्रश्न  सुरुवातीपासूनच आपण लावून धरला. विविध आंदोलन केली त्यामुळेच 2023  चा पाचशे कोटीचा आणि 2024 चा साडेसहाशे कोटींचा पिक विमा आपल्या जिल्ह्याला मंजूर झाला.  राज्यात सर्वाधिक पिक विमा आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यालाच मिळाला हे आपल्या आंदोलनाचे यश आहे हे देखील त्यांनी ठणकावून सांगितले.  
कर्जमाफी, पीकविमा  आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी  मी  गेल्या महिन्याभरापासून राज्यभर दौरे सुरू केले आहेत.  नाशिक, निफाड, सिन्नर,  संगमनेर,  अहिल्यानगर, शिक्रापूर,  शिरूर,कर्जत, जामखेड, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड, नागपूर, अमरावती,  आदि जिल्ह्यांमध्ये  27 मे रोजी सिंदखेडराजा येथे एल्गार मेळावा  घेतला आणि त्यानंतर आज संत नगरीत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन  तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे असे देखील यावेळी तुपकर म्हणाले.  निवडणुकीपूर्वी सरकारने कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही. मात्र आता सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झाले आहेत दुसरीकडे बँकांनी वसुली साठी तगादा लावला आहे.  बँका नव्याने कर्ज देत नाहीत. वास्तविक कर्जमुक्ती करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ  केले पाहिजे.  ज्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नाही  त्या शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा मिळाला पाहिजे, सोयाबीनला कापसाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव फरक दिला पाहिजे,जंगली जानवरांमुळे पिकांचे 50% नुकसान होते त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे,   शेतमजुरांना विमा संरक्षण दिले पाहिजे,  जिगाव प्रकल्पग्रस्तांना वाढीव दराने मोबदला मिळाला पाहिजे  यासाठी आपण आता लढा तीव्र करायचा आहे.  ही वेळ सरकारची आरती करायची वेळ नसून  हातात रूम्हणे घ्यायची वेळ आहे.  राज्यभरातील शेतकरी आता एकत्रित येत असून आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.  सरकारने वेळेच आपल्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळात मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा ईशारा देखील यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.  येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी या सरकारला कर्जमाफीची  जाणीव करून देणे आवश्यक आहे.  जो कर्जमाफी की बात करेगा.. वही स्थानिक स्वराज्य संस्था मे राज करेगा,  असा नारा आता गावोगावी देण्याची वेळ आली आहे. आपल्या न्याय हक्कासाठी मोठा संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन देखील यावे रविकांत तुपकर यांनी केले.  यापूर्वी कार्यकर्त्यांनी रविकांत तूपकरांची सजवलेल्या बैलगाड्यातून जंगी मिरवणूक काढून त्यांचे स्वागत केले.  या मेळावाला शेतकऱ्यांची गर्दी पहावयास मिळाली.


  तुपकर झाले धुरकरी...
 बैलगाडीतून शेतकऱ्यांनी काढली मिरवणूक 

 
एल्गार मेळाव्यासाठी शेगावात दाखल झालेल्या रविकांत तुपकरांची परिसरातील शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणुक कढत जंगी स्वागत केले. यावेळी शेगाव शहरातील अनेक व्यापारी स्वागतासाठी रस्त्यावर होते. रविकांत तुपकरांनी स्वतः बैलगाडी चालवत, धुरकरी होत बैलगाडीच्या रथाचे सारथ्य केले व बैलगाडी चालवतच ते सभाथळी पोहचले. 

यावेळी ज्येष्ठ नेते वासूदेव उन्हाळे, आर. बी. देशमुख, राजू शेळके, संतोष खेर्डे, विलासराव पाटील, भवगन मोरे, गजानन देशमुख, सदाशिव जाधव, ज्ञानदेव कराळे, अमोल राऊत, अनंता मानकर, अक्षय पाटील, वैभव जाणे, मासूम शहा, आनंदा आटोळे, उमेशसिंग राजपुत, नाना खटके, प्रकाश पाटील, युनूस भाई, कु. वैष्णवी भारंबे, दीपक देशमुख, सचिन शिंगोटे, भागवत धोरण, अनंता शेळके, निलेश गवळी, वैभव माळी, सेख अस्लम, सुनील अस्वार, श्रीकृष्ण मसुरकर, भास्कर तांदळे, अवी बोरसे, नंदू गावंडे , सोपान खंडारे यांच्या सह हजारो शेतकरी उपस्थित होते.