पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ‘ऑपरेशन कवच कुंडल’ राबविणार – नानाराव पाटील! शेगावात व्हाईस ऑफ मीडियाकडून विमान अपघातातील नागरिकांना श्रद्धांजली...
Updated: Jun 14, 2025, 09:27 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून त्यांचे जीवन कष्टप्रद व धोकादायक असते. या पार्श्वभूमीवर शेगावातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेसाठी ‘ऑपरेशन कवच कुंडल’ राबविण्याची घोषणा व्हाईस ऑफ मीडियाचे शेगाव तालुका अध्यक्ष नानाराव पाटील यांनी केली.
दिनांक १३ जून रोजी शेगाव येथील विश्राम भवनात व्हाईस ऑफ मीडियाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रारंभी अहमदाबाद येथील दुर्दैवी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या बैठकीत पत्रकारांसाठी विमा कवच योजना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यविषयक सुरक्षेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पत्रकारांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्यावर उपाययोजना ठरविण्यात आल्या.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष कृष्णाजी सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रवक्ते फहीम देशमुख, जिल्हा संघटक अमर बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष नानाराव पाटील होते.
बैठकीत प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्या जंगी सत्काराचे आयोजन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
बैठकीस शहराध्यक्ष दिनेश महाजन, कार्याध्यक्ष महेंद्र मिश्रा, उपाध्यक्ष सतीश अग्रवाल, सचिव ज्ञानेश्वर ताकोते, संजय ठाकूर, राजवर्धन शेगोकार, प्रकाश उन्हाळे, समीर देशमुख, दिनेश घाटोळ, विठ्ठल अवताडे, प्रा. रोहित देशमुख, मंगेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.