MPSC परीक्षा देऊन परतताना अपघात; खामगावच्या चालकासह २ ठार; बहीण-भाऊ गंभीर जखमी
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कार आणि बोलेरो पिकअपचा समोरासमोर अपघात झाला. यात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना अकोला- दर्यापूर रोडवरील कट्यार फाट्याजवळ आज, ४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
अपघातात ठार झालेल्यांत खामगाव येथील ज्ञानेश्वर रवींद्र खेडकर (२९) तर जखमींमध्ये खामगाव येथील जागृत मोमैया व नेहा मोमैया या बहीण- भावांचा समावेश आहे. याच अपघातातील बोलेरो पिकअपचा चालक अब्दुल जुबेर अब्दुल शरीफ (३५, रा. दहीहांडा, अकोला) देखील ठार झाला असून, तो अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे.
आज एमपीएससीची परीक्षा असल्याने जागृत व नेहा या बहीण- भावांना घेऊन ज्ञानेश्वर कारने काल रात्रीच अमरावती येथे गेला होता. पेपर झाल्यानंतर आज परतताना अकोला- दर्यापूर मार्गावरील कट्यार फाट्याजवळ त्यांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिलिंडर वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपने धडक दिली. यात ज्ञानेश्वर व बोलेरो पिकअपच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. जागृत व नेहा दोघा बहीण भावांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आई, वडील असा परिवार आहे.