ज्ञानार्जना ऐवजी अर्थार्जन! चोरट्यांची मध्यरात्री शाळेत हजेरी – एलईडी टीव्हीसह शालेय साहित्य लंपास!

 
 खामगाव (भागवत राऊत – बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा):
शाळा म्हणजे ज्ञानार्जनाचे मंदिर, पण खामगाव तालुक्यातील रामनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चोरट्यांनी ज्ञानाऐवजी अर्थार्जनावर भर दिला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून शाळेतील ३२ इंची एलईडी टीव्ही आणि स्वयंपाकासाठी ठेवलेले खाद्यसामग्री चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज (४ जून) सकाळी उघडकीस आला.

ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी भेट दिलेला एलईडी टीव्ही चोरीला गेला असून, यासोबतच विद्यार्थ्यांसाठीच्या जेवणात वापरण्यात येणारे १० पाकिटे तेल, १५ किलो तिखट मसाला आणि २ किलो हळदही चोरट्यांनी लंपास केली.
शाळेचे मुख्याध्यापक रमेश जुमळे सकाळी साडेआठ वाजता शाळेत पोहोचले असता, कार्यालयाचे कुलूप तुटलेले त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पाहणी केली असता, शाळेत चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी झालेल्या चोरीमुळे संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास करून चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.