

बिबट्याची दहशत! शेतकरी, पशुपालक चिंतेत; गुळभेली शिवारात बिबट्याने पाडला १२ बकऱ्यांचा फडशा...
Apr 22, 2025, 08:38 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गुळभेली शिवारात बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला चढवित १२ बकऱ्यांच्या फडशा पाडला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ६ एप्रिल रोजी सारोळा मारोती शिवारात बिबट्याने ७ बकऱ्या ठार केल्या होत्या. त्या घटनेला पंधरा दिवसाचा कालावधी उलटत नाही तर काल २१ एप्रिलच्या सकाळी ४ वाजेच्या सुमारास गुळभेलीत १२ बकऱ्यांच्या फडशा पाडला.
आत्माराम पंढरी दळवी गुळभेली शिवारात शेती आहे. त्यांनी शेतात पशुधनासाठी टीनशेडचा गोठा बांधलेला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी त्या टिनशेडमध्ये बकऱ्या बांधून ठेवून रात्री घरी निघून गेले होते. दरम्यान, २१ एप्रिलच्या सकाळी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने दळवी यांच्या गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर तारेच्या जाळीत घुसून अचानक हल्ला चढवित ७ बकऱ्या, ३ बोकड, २ पिल्ले, असे बारा जनावरे ठार केले. तर १ बोकूड जखमी केले आहे. आत्माराम दळवी हे सकाळी ६ वाजेच्या दरम्यान गोठ्यात गेले असता त्यांना आपले पशुधन भयावह परिस्थीती दिसून आली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे रोहिणखेड बीटचे वनपाल एस. एच. जगताप, वनरक्षक आर. बी. शिरसाट, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कोकाटे हे घटनास्थळी पोहचून त्यांनी ७ बकऱ्या, ३ बोकड, २ पिल्ले व जखमी झालेल्या बोकड पिल्लाचा पंचनामा करीत अहवाल वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पाठविला आहे.