भावाच्या लग्नात हौसेने फोटो काढणे महागात पडले! बुलढाण्याच्या महिलांसोबत शेगावात घडला धक्कादायक प्रकार....
May 9, 2025, 11:56 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भावाच्या लग्नात
हौशेने फोटो काढणे एका महिलेला व तिच्या जावुबाईला चांगलेच महागात पडले आहे. शेगाव येथील एका मंगलकार्यालयात नवरदेव नवरीच्या शेजारी उभे राहून फोटो काढणाऱ्या दोन महिलांच्या दागिने व पैसे असलेली पर्स अज्ञात चोरटयाने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बुलढाणा येथील सौ. उमा मिलिंद तायडे (३५) या त्यांच्या जावूबाईसह भावाच्या लग्नासाठी शेगाव येथील हॉटेल शिवांश सेलिब्रेशन येथे आल्या होत्या. यावेळी त्या दोघी नवरदेव नवरीच्या शेजारी हौशेने फोटो काढण्यासाठी गेल्या असता खुर्चीवर ठेवलेल्या त्यांच्या पर्स अज्ञात चोरटयाने लंपास केल्या या पर्समध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६३ हजारांचा ऐवज होता. या घटनेने लग्न कार्यात काही काळ धावपळ उडाली होती. या प्रकरणी सौ. उमा तायडे यांनी शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरुध्द कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.