माकोडीत खोपडी बारस उत्सवाची भव्य महाप्रसादाने सांगता; निस्वार्थ भावनेने रामनाम घ्या - श्रीहरी महाराज

 
माकोडी( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):-भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा असे सांगून केवळ प्रापंचिक सुखासाठी सुरू असलेली धावपळ सर्वत्र पाहायला मिळत आहे. व्यावहारीक हिशोबात पैशासाठी, भौतिक सुविधेसाठी आटापिटा सुरू असल्याने ईश्वर प्राप्तीसाठी मिळालेला मानवी देह आत्मीक आनंदापासून दुर जात आहे. त्यामुळे रामनामाच्या व्यवहारात दक्षता बाळगून निस्वार्थ भावनेने रामनाम घ्या असे मौलिक मार्गदर्शन समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराज यांनी केले.
खोपडी बारस सोहळयाची काल १३ नोव्हेंबरला भव्य महाप्रसादाने सांगता करण्यात आली. दरम्यान भाविकांना मार्गदर्शन करतांना श्रीहरी महाराज बोलत होते. यावेळी श्रीहरी महाराजांनी स्वत:च्या हस्ते भाविकांना कापड प्रसादाचे वितरण केले. ते म्हणाले की, कृपाळु भगवंताची मनापासून आवळणी करा, यातच जीवनाचे सार आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी नामजपाचे बॅलेन्स वाढवा.
जकड
भाविकांना कापड प्रसादाचे वितरण करताना तर बाजूला यज्ञकुंडामध्ये नामजपची पूर्णाहुती देताना श्रीहरी महाराज

 

कृपादृष्टीचे व्याज परतावा म्हणून मिळेल आणि समाधानरुपी समृध्दी नांदेल. केवळ भगवंतावर निष्ठा आणि भक्ती अढळ ठेवा. मनातील द्वेष व मत्सराची जळमटक काढून टाका. तुज आहे तुज पाशी, प्रमाणे भक्तीसाठी उध्दार नाही कोणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, असे सांगीतले. तत्पुर्वी ११ नोव्हेंबरला चैतन्य मंदिरात श्रीराम प्रभूच्या मुर्तीला अभिषेक करून काकडा आरतीने या सोहळयाची सुरूवात करण्यात आली. सकाळी श्रीहरी महाराजांच्याहस्ते यज्ञकुंड प्रज्वलीत
करण्यातआला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. १२ नोव्हेंबरला सायंकाळी जळगाव जामोद, निरपूर, मलकापूर, टाकळी गवळी, व परिसरातील पायी दिंड्याचे श्री क्षेत्र माकोडी येथे आगमन
झाले. सायंकाळी अकोला येथील डॉ. कल्याणी पद्मने यांचे सुश्राव्य किर्तन पार पडले. १३ नोव्हेंबरला सकाळी रामनाम जपाची पुर्णाहूती दिल्यानंतर हभप ज्ञानेश्वर माऊली निरपूरकर यांनी "सद्गुरु कृपेचा महिमा" आपल्या किर्तनातून सांगीतला. यज्ञ स्थळ मंडपाची केळीच्या पानांनी केलेली सजावट आकर्षक ठरली. मलकापूरच्या राम उपासक मंडळाने भाविकांच्या सुविधेसाठी मलकापूर ते माकोडी मोफत वाहन व्यवस्था केली होती. अकोला येथील ब्रम्हवृंदानी सोहळयासाठी मंत्रपठण केले. विदर्भ, मराठवाडा व खानदेश सह राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या माकोडी भक्तांच्या मांदीयाळीने चैतन्य मंदिर परिसर दुमदुमला होता. दुपारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी तुळशी विवाह करण्यात आला. यावेळी आतषबाजी करुन सोहळ्याची सांगता झाली....