घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय, ५ ब्रास वाळू मोफत मिळणार! पंचायत समिती संग्रामपूरमार्फत तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर

 

संग्रामपूर ( स्वप्निल देशमुख: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आता ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा शासन निर्णय आता प्रत्यक्ष अंमलात येत आहे. पंचायत समिती संग्रामपूरचे गट विकास अधिकारी माधव पायघन यांनी संबंधित लाभार्थ्यांची यादीसह तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.
राज्य शासनाच्या विशेष धोरणांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे घरकुल बांधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाळूचा खर्च परवडत नसल्यामुळे अडथळा येणाऱ्या घरबांधणीसाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. विशेष म्हणजे, लाभासाठी कोणत्याही अर्जाची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांना थेट ऑनलाईन वाळू पास देण्यात येणार आहे.
वाळू काळाबाजाराला आळा आणि गरिबांच्या हक्काचे घर हे या योजनेमागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पंचायत समितीने योजनेच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलल्याने संग्रामपूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना लवकरच याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
गट विकास अधिकारी माधव पायघन यांनी सांगितले की, "लाभार्थ्यांनी मोफत वाळू मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा. कोणालाही हप्त्यासाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही. दलालांपासून सावध राहावे," असे आवाहनही त्यांनी केले.