‘आपलेपणाची भावना निर्माण झाली तर भटक्या-विमुक्त समाजाचा उत्कर्ष दूर नाही’; ही जबाबदारी केवळ सरकारची नाही,आपल्या सर्वांची ! सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन!
म्हणाले, ‘हा समाज परका नाही, आपलाच आहे’; खामगावात सर्वोदय पारधी आश्रमशाळेच्या भव्य सभागृह व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन
सरसंघचालक डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणातून भटक्या-विमुक्त समाजाच्या वर्तमान परिस्थितीमागील सामाजिक कारणांवर भाष्य केले. परकीय आक्रमणे आणि पारतंत्र्याच्या काळात समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून तुटले. कालांतराने आपल्याच समाजातील या घटकांशी एकमेकांचा परिचय आणि आपलेपणाची भावना कमी होत गेली आणि त्यातून एक मोठी सामाजिक दरी निर्माण झाली.“आपल्या समाजात आपल्याच समाजाचे घटक मागे पडले. कारण परिचय नाही, आपलेपणा नाही. तोच हा घुमंतू समाज आहे,” असे डॉ. भागवत म्हणाले.
भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रथम समाजाच्या मनातील दरी दूर झाली पाहिजे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.“हा जो भटका-विमुक्त समाज आहे, यातला प्रत्येक माणूस आपला माणूस आहे. यांच्याकरिता काही करून त्यांना सावरण्याची संधी मिळाली पाहिजे. हे आपलेपणाची भावना असेल तरच होऊ शकते,” असे ते म्हणाले. भटक्या-विमुक्त समाजाचा इतिहास संघर्षाचा,पराक्रमाचा आहे. परकीय आक्रमणांच्या काळात घुमंतू समाजातील लोक भटकत राहिले, मात्र त्यांनी संघर्ष सोडला नाही. त्यामुळे ब्रिटिशांनी या समाजातील अनेक घटकांना गुन्हेगार ठरवल्याचा संदर्भही त्यांनी दिला.
भारत विश्वगुरू व्हावा, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र देशाला ही उंची गाठायची असेल तर समाजातील प्रत्येक घटक समान भावनेने जोडला गेला पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले. “देश आपला विश्वगुरू झाला पाहिजे, असे सगळ्यांना वाटते. पण असे व्हायचे असेल तर आपला सर्व समाज "सारखा" झाला पाहिजे. हे समाजाने करायचे काम आहे. केवळ सरकारवर सोडून चालणार नाही. सरकार जे करायचे ते करेल पण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले..
सर्वोदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेत उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचे कौतुक करताना डॉ. भागवत म्हणाले की, समाजासाठी केलेले काम किती मोठे आहे यापेक्षा ते कोणत्या भावनेतून केले जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे.“इथे काम चालले आहे आणि ते काम वाढत आहे, याचा आनंद आहे. जेव्हा आपल्याला जगात काही लोक चांगले करताना दिसतात, त्याचा जो आनंद आहे, त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही,” असे त्यांनी सांगितले. भटक्या-विमुक्त समाजाच्या उत्कर्षासाठी अशा प्रकल्पांना समाजाचा आधार मिळाला पाहिजे. काम छोटे असो किंवा मोठे, त्यामागची भावना महत्त्वाची आहे. ‘या समाजाच्या उत्कर्षातच आपला उत्कर्ष आहे’, ही भावना समाजात निर्माण झाली पाहिजे असे डॉ.मोहन भागवत म्हणाले..
मनुष्य केवळ एकटा नसतो. त्याचे कुटुंब असते आणि कुटुंबातून समाजाची निर्मिती होते, असे सांगत डॉ. भागवत यांनी कुटुंबव्यवस्थेचे महत्त्वही स्पष्ट केले.“सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय युनिट हे कुटुंब आहे. कुटुंब नीट असेल तर समाज नीट राहतो. कुटुंब नीट ठेवण्यासाठी माणसाला प्रयत्न करावा लागतो,” असे त्यांनी नमूद केले.