खामगावात पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात! दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू; पती-मुलगी गंभीर जखमी

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाकडे वळणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर  पती आणि मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजताच्या सुमारास खामगाव तालुक्यातील रोहणा गावाजवळील पेट्रोल पंप परिसरात घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पेट्रोल भरण्यासाठी वळण घेताच मागून धडक

या अपघातात अनिता अनिल कळसकर (वय ४९, रा. वर्णा, ता. खामगाव) यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती अनिल जयराम कळसकर आणि मुलगी संध्या कळसकर हे दोघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कळसकर हे पत्नी अनिता आणि मुलगी संध्या यांच्यासह दुचाकीने वर्णा येथून खामगावकडे जात होते. रोहणा गावाजवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी दुचाकी वळवली. त्याचवेळी मागून आलेल्या एमएच २८ सीई १४२२ क्रमांकाच्या दुचाकीच्या चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

महिलेचा मृत्यू; पती-मुलगी जखमी

धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात अनिता कळसकर यांचा मृत्यू झाला, तर अनिल कळसकर आणि त्यांची मुलगी संध्या जखमी झाले. अपघातात दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले. या घटनेमुळे कळसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी मनोहर जयराम कळसकर (वय ५२, रा. वर्णा, ह.मु. मांडका, ता. खामगाव) यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी संबंधित दुचाकीचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१ आणि ३२४(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.